चार महिन्यांनंतरच मुहूर्त : मनपा आयुक्तांची माहिती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या बहुप्रतिक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी जायकवाडी धरणात खोदण्यात येणाऱ्या अॅप्रोच चॅनलचे काम आता चार महिन्यांनंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. धरणातील पाण्याची पातळी कमी झालेली असताना, शहराला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी हे अॅप्रोच चॅनल तातडीने तयार करावे, असा आग्रह पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे धरला होता. धरणाची पाणीपातळी वाढण्यापूर्वी हे अपेक्षित काम पूर्ण झाल्यास भविष्यातील पाण्याची मोठी समस्या टळेल, असा अंदाज वर्तवला जात होता; मात्र आता या कामाला चार महिन्यांचा ब्रेक लागल्याने पाणी योजनेची प्रतीक्षा अधिक वाढणार आहे.
तर कॉफर्ड डॅमला तडे
अॅप्रोच चॅनलच्या कामाबद्दल आयुक्त अमोल येडगे यांना विचारले असता ते म्हणाले, जॅकवेलमधील पाणी जोपर्यंत उपसण्यात येत नाही तोपर्यंत अॅप्रोच चॅनलचे काम करायचे नाही, असा निर्णय झाला आहे. अॅप्रोच चॅनलसाठी जायकवाडी धरणात ब्लास्टिंग करावे लागणार आहे. ब्लास्टिंग केल्यास कॉफर्ड डॅमच्या संरक्षक भितींला इजा पोहोचू शकते, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कॉफर्ड डॅमवन विशिष्ट प्रकारचे शेड उभारल्यानंतर तो फोडण्याची प्रक्रिया करावी लागणारआहे. पीईबी स्ट्रक्चर उभारण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे अॅप्रोच चॅनलच्या कामासाठी चार महिने थांबावे लागणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














